History

कोल्हापूर मधील प्रसूती सेवा काही डॉक्टर आणि काही मीडवाईफ अर्थात सुईणी यांच्या साह्याने चालू होती. डाॅ. केळवकर , डाॅ. डॅनिंग (Mary Wanless Hospital ) डाॅ. सुमती क्षेत्रमाडे, डाॅ. किर्लोस्कर या डॉक्टर मंडळी बरोबर दाभोळकर, पुरोहित यांच्यासारख्या प्रशिक्षित सुईणी तेव्हा प्रसुतीचे काम करत होत्या. त्याच बरोबर स्त्रीरोगतज्ञ येण्याआधी डॉक्टर भद्रे , डाॅ. जाधव ही सर्जन मंडळी अडलेल्या बाळंतीणीला ऑपरेशनची गरज लागल्यास मदतीला येत होती.यात डॉक्टर भद्रे, डॉक्टर प्रभू, डाॅ. देशपांडे यांची नावे आठवतात. डाॅ. भद्रे यांनी सीपीआर आणि सावित्रीबाई फुलेहॉस्पिटल मध्ये प्रसूतीचे मूलभूत काम सुरू केले . डाॅ. नीना पाटील, डाॅ. चौगुले डाॅ. आमटे, डाॅ. राशिनकर त्यांनी एकाच वेळी कोल्हापूर मध्ये प्रॅक्टिस सुरू केली. त्यांनी गरजेनुसार सर्जनची मदत घेतली. डॉक्टर कुडाळकर हे पहिले स्त्रीरोगतज्ञ म्हणून आले. त्यानंतर डाॅ. ..नागावकर, डाॅ. आशा थत्ते,डाॅ. उषा पाटणकर,डाॅ. मीना भद्रे त्यांनी कोल्हापूरमध्ये पाऊल ठेवले आणि मग पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या स्त्रीरोगतज्ञांची वाटचाल सुरू झाली

1978
Kolhapur Obstetrics and Gynaecological Society (KOGS) History
Kolhapur Obstetrics and Gynaecological Society (KOGS) Founded

कोल्हापूर स्त्रीरोग संघटना !2022 मध्ये 175 सभासद संख्या असणाऱ्या या डेरेदार वृक्षाचे बीज 1978 मध्ये रुजलं. डॉ. बी एन पुरंदरे सरांच्या (तेव्हाचे FIGO प्रेसिडेंट) प्रोत्साहनाने 1978 मध्ये पहिली टीम KOGS तयार झाली.

संस्थापक अध्यक्ष डॉ. शशिधर कुडाळकर 

संस्थापक सचिव- डॉ. .. नागावकर,

कोषाध्यक्ष डॉ. आशा थत्ते 

सोसायटी स्थापनेचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर डॉक्टर पुरंदरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. अशा तऱ्हेने 1978 मध्ये कोल्हापूर स्त्रीरोग संघटनेची मुहूर्तमेढ रुजली. त्याचे उद्घाटन 'LIVE SURGICAL DEMONSTRATION OF VAGINAL HYSTERECTOMY AND TUBOPLASTY ' या सर्जिकल वर्कशॉपने डॉ. पुरंदरे यांनी केले. सुरुवातीचे सभासद डॉ. कुडाळकर, डॉ. ..नागावकर, डॉ. विदुला जोशी, डॉ. रोहिणी लिमये, डॉ. आशा थत्ते, डॉ. राशिनकर, डॉ. उषा पाटणकर, डॉ. निर्मला जोशी, डॉ. अरगडे, डॉ.  राधिका जोशी, डॉ.  नीना पाटील,डॉ. मीना भद्रे /मालाडकर असे होते. सभासद संख्या मर्यादित असल्याने मीटिंग सभासदांच्या घरीच शनिवारी किंवा रविवारी होत असे. सभासद फी फक्त शंभर रुपये होती. मीटिंगमध्ये वेगवेगळ्या केसेस वर चर्चा होत असे. सभासद संख्या वाढू लागल्यावर मीटिंग मोठ्या हॉलमध्ये किंवा डॉ. अरगडे यांच्याकडे किंवा हॉटेलमध्ये होऊ लागल्या. 2010 मध्ये संस्था रजिस्टर संस्था झाली. आतापर्यंत अनेक सभासदांनी स्त्री आरोग्याच्या वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवले आहे. FOGSI ने त्यावर मोहर उठवून वेगवेगळी, FOGSI training centres कोल्हापूर मध्ये कार्यरत आहेत. राधिका जोशींचे Colposcopy training centre हे कोल्हापूर मधीलच नव्हे तर भारतातले पहिले Colposcopy training centre आहे.

1998
Live Workshop

1998 मध्ये सोनोग्राफीचा लाईव्ह वर्कशॉप घेण्यात आला. तेव्हा अध्यक्ष डॉ. ज्योत्स्ना भद्रे, सचिव डॉ. भारती अभ्यंकर आणि डॉ. अंजली भागवत कार्यरत होत्या. मार्गदर्शन करण्यासाठी चेन्नईहून डॉ. सुरेश स्वतः कोल्हापूरला आले होते. (LIVE WORKSHOP) प्रत्यक्ष दर्शी अशी पहिलीच कार्यशाळा होती.

2009
West Zone YUVA FOGSI

West Zone YUVA FOGSI- 2009 मध्ये घेण्यात आली. डॉ. सुलभा कुलकर्णी परिषदेच्या अध्यक्ष, डॉ. भारती अभ्यंकर सचिव होत्या. ही मोठी परिषद यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली. FOGS ला रु.४५,०००/ सुपूर्द करण्यात आले.

2013
AMOGS

AMOGS 2013, या साठी डॉ.  भारती अभ्यंकर चेअरपर्सन आणि डॉ.  मंजुळा पिशवीकर सचीव म्हणून कार्यरत होत्या. कॉन्फरन्स खूप यशस्वी झाली. त्यासाठी शिवाजी विद्यापीठातील भाषा भवन मध्ये नवीन मंडप तयार केला गेला.

2013
PCPNDT

PCPNDT- 2013 सक्रीय गटाची स्थापना केली. बेटी बचाव या उदिष्टासाठी अनेक कार्यक्रम केले गेले. लिंगा धिष्टीत गर्भपात टाळण्यासाठी त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी सर्व सभासदांनी सायलेंट ऑब्झर्वर या मशीन साठी 28 हजाराचे योगदान दिले. तेव्हाचे कलेक्टर डॉ. लक्ष्मीकांत देशमुख यांनी कोल्हापूर मधील डॉक्टरांचा या कार्याबद्दल गौरव केला. हे मशीन सोनोग्राफी मधील प्रत्येक निरीक्षण नोंदवून ठेवत होते. तीन वर्ष याचा काम चालू राहीले.

2020
Womens Day

KOGS ने अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत. अनेक आरोग्य शिबिर आयोजित करून तसेच चर्चासत्र घेऊन जनजागृतीचा प्रयत्नही केला आहे. 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिला पोलीस आणि पोलिसांच्या कुटुंबियांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तीनशे स्त्रियांची तपासणी करण्यात आली. 2020 हे महामारीचे वर्ष होतं. तेव्हा KOGS च्या अध्यक्ष डॉ. मंजुळा पिशवीकर यांनी सीपीआर हॉस्पिटल मधील निवासी डॉक्टरां साठी आरोग्य रक्षक (PPE KIT) प्रदान केले होते.

2021
ZONAL CONFERENCE

ZONAL CONFERENCE 2021 मध्ये ऑनलाईन घेण्यात आली. तेव्हा अध्यक्ष डॉ. मंजुळा पिशवीकर, सचिव डॉ. अनघा कुलकर्णी आणि डॉ. सुरेखा आडनाईक कार्यरत होत्या. ही कॉन्फरन्स इतर अनेक संघटनांबरोबर (सातारा, सांगली, कराड) घेण्यात आली. यात डॉ . . नागावकर, डॉ. अजित चांदेलकर यांना AMOGS RATNA AWARDS देऊन गौरवण्यात आले. दीर्घ काळासाठी कोल्हापूर संघटनेत कार्यरत असणाऱ्या या ज्येष्ठ सभासदांचा उचित गौरव करण्यात आला.

2022
Womens Day

२०२२, यावर्षी आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मार्चला 'जागृती एक प्रवास - स्त्री म्हणून माहिती असावे असे काही' या आरोग्य पुस्तिकेचे प्रकाशन माननीय आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. सावित्रीबाई फुले हॉस्पिटल मध्ये हा समारंभ पार पडला. त्यावेळी 100 आशा वर्कर ना हे पुस्तक मोफत वाटण्यात आले. पुस्तिकेच्या मागची स्त्रीरोगतज्ञ संघटनेची भूमिका संघटनेच्या अध्यक्षा निरुपमा सखदेव यांनी स्पष्ट केली. आशा वर्कर स्त्री आरोग्याच्या संबंधित एक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यांना प्रसूतिपूर्व तपासणी, प्रसुतीपश्चात तपासणी, कुटुंब नियोजन या व्यतिरिक्तही स्त्रियांच्या आरोग्याच्या इतर समस्यांबद्दल माहिती करून देण्याच्या उद्देशाने ही पुस्तिका छापण्यात आली आहे. कोल्हापूर आरोग्य संघटनेच्या अनेक सदस्यांनी या पुस्तिकेत स्वतःच्या अनुभवाचा आणि कौशल्या चा उपयोग करून विविध विषयांवर लेख लिहिले आहेत. यानंतर पंचगंगा हॉस्पिटल मध्ये डॉ. मंजुळा पिशवीकर, डॉ. सुलभा कुलकर्णी, डॉ. विद्या काळे यांनी आशा वर्कर शी संवाद साधला.

तसेच आयसोलेशन हॉस्पिटल मध्ये डॉ. निरुपमा सखदेव, डॉ. अंजली भागवत, डॉ. किशोर केसरकर, डॉ. वाघ यांनी आशा वर्करशी सुसंवाद साधून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली त्यांना 'जागृती एक प्रवास' ही आरोग्य पुस्तिका देण्यात आली. आत्तापर्यंत ५०० आशा वर्कर पर्यंत पुस्तिका पोहोचल्या असून ही मोहीम अजूनही चालू ठेवण्यात येणार आहे.

वेगवेगळ्या परिषदा अर्थात शैक्षणिक घोडदौड

महाराष्ट्रातील सर्व स्त्री रोग तज्ञ संघटनांची AMOGS ही संस्था आहे.

  • Zonal conference 1989
  • AMOGS 1993
  • AMOGS 2013
  • RCOG Conference
  • Yuva FOGSI 2008

आता सद्यस्थितीत 

  • डॉ. राधिका जोशी – Colposcopy
  • डॉ. भारती अभ्यंकर -Colposcopy
  • डॉ. पद्मरेखा जिरगे– ICOG recognised center for training in Reproductive medicine.
  • डॉ. अजित पाटील – ICOG USG training centre.Fellowship for 6 months
  • डॉ. सचिन कुलकर्णी -Fellowship in reproductive medicine
  • डॉ. प्रवीण हेंद्रे – Fellowship in minimal access surgery by MUHS

Post gradute education is available under 

  • प्रिस्टिन हॉस्पिटल – CPS DGO
  • पत्की हॉस्पिटल– CPS DGO

KOGS च्या अनेक सभासदांनी KMA मध्येही भरीव कामगिरी केली आहे. त्यापैकी डाॅ. राधिका जोशी, डाॅ.अजित चांदेलकर, डाॅ.रोहिणी लिमये ,डाॅ.विद्युत शहा आणि आता सध्याच्या डाॅ. गीता पिल्लई यांनी KMA चे अध्यक्षपद भूषवले आहे.

डाॅ. शशिधर जनार्दन कुडाळकर हे नाव ऐकलं की, नजरेसमाेर उभं राहतं हे एक अत्यंत, हसरं, प्रभावी व्यक्तिमत्व. सर निष्णात सर्जन हाेते. त्यांच्या मनमिळावू स्वभावामुळे, आश्वासक हास्यामुळे त्यांच्याबराेबर काम करताना डाॅक्टर्स, हाॅस्पिटलमधील कर्मचारी सर्वानाच छान वाटायचं. त्यांच्या हसऱ्या आश्वासक चेहऱ्यामुळे पेशंटना त्यांना भेटूनच निम्मे बरे वाटायचे.

डाॅ. कुडाळकर सर मुळचे मालवणचे. त्यांचे वैद्यकीय शिक्षण मुंबईला के.ई.एम. हाॅस्पिटल आणि वाडीया हाॅस्पिटलमध्ये झाले. डाॅ. बी. एन पुरंदरेंच्या मार्गदर्शनाखाली ते स्त्रीराेग व प्रसुती शास्त्रात एम.डी. झाले. डाॅ. पुरंदरेंच्या सल्ल्यानुसार सर 1960 साली काेल्हापूरात आले. त्यावेळी काेल्हापूरात डाॅ. भद्रे, डाॅ. वझे, डाॅ. प्रभू हे सर्जनस् हाेते, पण डाॅ. – कुडाळकर सर हे काेल्हापूर मधील पहिलेच स्त्रीराेग व प्रसूतिशास्त्र तज्ञ हाेते. प्रथम ते सी.पी. आर. हाॅस्पिटलमध्ये मानद स्त्रीराेगतज्ञ म्हणून रुजू झाले नंतर त्यांनी महाद्वार राेडवर स्वतःचे हाॅस्पिटल सुरू केले.
डाॅ. कुडाळकर सरांचे आपल्या शास्त्रामधील ज्ञान सखाेल हाेतेच पण त्यांचे शस्त्रक्रियांमधील काैशल्यही वादातीत हाेते. सरांचे व्हजायनल सर्जरीचे काैशल्य मंत्रमुग्ध करणारे हाेते. वैद्यकीय क्षेत्रात एक अलिखित नियम आहे, ज्या सर्जनची सर्जरी बघताना अत्यंत साेपी वाटते ताे उत्तम सर्जन. सरांचे व्हजायनल सर्जरीचे काैशल्य असेचे हाेते, साधे, सरळ, साेपे तरीही पाहात रहावे असे स्वच्छ, रक्तविरहीत दिखणे.
Calvuplesa Vaginal Hypoteectory सरांचा हातखंडा हाेता. मग युटरस व्हजायनामधून डाेकावणारं असाे (Uterine prolapse) अगर 16-18 आठवड्याएवढं पाेटामध्येच ठिय्या मांडणारं असाे (Florida Uterus) कधी ङ्मुटरसवर मधाेमध छेद घेऊन तर कधी फाइब्राॅइड – मायाेमे्नटामी करून सर अर्ध्या तासात व्हजायनल हिस्टेक्टाॅमी पूर्ण करायचे. ऑपरेशन कितीही माेठं असलं तरी ऑपरेशन थिएटरमधील वातावरण खेळकर ठेवण्याचे सरांचे कसब त्यांच्या ऑपरेशनमधील काैशल्यासारखेच वाखाणण्याजाेगे हाेते. या सर्वामुळे पेशंट ऑपरेशननंतर वेदनाविरहीत, समाधानी असायचे. सर व्हजायनल स्टरलायसेशन तर लाेकल अ‍ॅनास्थेशियाखाली फक्त 5 ते 10 मिनीटात करायचे. आज जेव्हा ‘व्हजायनल सर्जरी’ भविष्यात अस्तंगत हाेणार का? असे प्रश्न वैद्यकीय क्षेत्रात विचारले जातात तेव्हा सरांची उणीव भासल्याशिवाय राहात नाही.
सरांबराेबर तीन वर्षे सी.पी.आर. हाॅस्पिटलमध्ये काम करणे हा माझ्यासाठी खूप छान अनुभव हाेता. आम्ही दाेघेही वाडीया हाॅस्पिटलमध्ये डाॅ. बी. एन. पुरंदरे सरांचे शिष्य असल्यामुळे आमच्यामध्ये खूप छान समन्वय हाेता. हसत खेळत, गप्पा ङ्कारत आम्ही मजेत काम करत असू. ज्यूनीअर डाॅक्टर्सवर पूर्ण विश्वास टाकून सर्व काम साेपवायचे पण काेणाला काही अडचण आली तर सर कायम पाठीशी उभे असायचे.
आपल्या KOGS ची सुरवात डाॅ. नागावकर यांच्या पुढाकाराने ——- साली झाली. कुडाळकर सर पहिले प्रेसिडेंट तर नागावकर सर पहिले सेक्रेटरी हाेते. उद्घाटनाला डाॅ. बी. एन. पुरंदरे सर आले हाेते. त्यांनी सी.पी.आर हाॅस्पिटलमध्ये व्हजायनल हिस्टरेक्टाॅमी आणि ट्यूबाेप्लास्टीचे सुंदर प्रात्यक्षिक दाखविले.
त्यावेळी फारच थाेडे KOGS मेंबर्स हाेते. डाॅ. मीना मालाडकर, डाॅ. नागावकर, डाॅ. राेहीणी लिमये,
डाॅ. राधिका जाेशी, डाॅ. आशा थत्ते, डाॅ. पाटणकर, डाॅ. राशिंगकर, डाॅ. नीना पाटील वगैरे. मी 1977 साली काेल्हापूरात आले त्यावेळी आम्ही 10-12 मेंबर्स असल्यामुळे घरीच मिटींग घेत असू. कधी एखादया केसविषयीची चर्चा तर कधी काेणी नवीन काही वाचले असेल तर त्यावर चर्चा. मस्तपैकी गप्पा मारत घरचे जेवण. मजा यायची कुडाळकर सरांच्या घरचे ही एक मेजवाणीची असायची. 
अशा या काेल्हापूरच्या दिग्गज स्त्रीराेग-प्रसूतिशास्त्र तज्ञाला आपल्यातून जाऊन इतकी वर्षे झाली तरी त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या आणि शल्यकाैशल्याच्या आठवणी अजुनी ताज्या आहेत.
अशा माझ्या गुरूला विनम्र अभिवादन.
 

डाॅ. शशिधर जनार्दन कुडाळकर

1978 सुवर्ण मुहूर्तमेढ
1970 सालि DGO MD पास झाल्यानंतर मी कोल्हापुरात प्रॅक्टिस करायचे ठरवले व खरी कॉर्नर येथे भाड्याने घेतलेल्या जागेत हॉस्पिटल सुरू केले. 1970 चाली कोल्हापुरात हाताच्या बोटावर मोजता येण्या इतकेच गायनॅकॉलॉजिस्ट होते. त्या वेळी एकमेकांच्या गाठीभेटी होत नव्हत्या. फक्त अमुक एक डॉक्टर आहेत व ते ठराविक एरियात प्रॅक्टीस करतात इतकेच माहीत असायचे. त्यावेळी सर्व नर्सिंग होम्स हे मॅटर्निटी व गायनॅकचे काम करीत होते. सर्वप्रथम 1976 साली माझा Dermatoglyphical Studies in primary amenorrhea हा पेपर मेक्सिको येथील जागतिक परिषदेमध्ये वाचण्यासाठी सिलेक्ट केला गेला. या परिषदेच्या निमित्ताने मुंबई येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉ. बी एन पुरंदरे, डॉ. बी एन पुरंदरे, डॉ. पंडित, डॉ. महेंद्र पारिख, डॉ. शिरीष दप्तरी, डॉ. देशमुख, डॉ. रावळ व डॉ. सर्य्या यांची ओळख झाली. डॉ. पुरंदरे त्यावेळी FIGO चे अध्यक्ष होते व ते सारखे कोल्हापुरात सोसायटीच्या स्थापनेसाठी आग्रह करू लागले. मग मात्र मी हा विषय मनावर घेतला व त्या दृष्टीने प्रयत्न चालू केले. प्रथम डॉक्टर कुडाळकर यांना मी ही संकल्पना सांगितली व त्यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे मान्य केले. यानंतरची पायरी -डॉ. आरगडे, डॉ. विदुला जोशी, डॉ. राधीका जोशी, डॉ. रोहिनी लीमये, डॉ. आशा थत्ते, डॉ. राशिनकर, डॉ. पाटणकर, डॉ. निर्मला जोशी या सर्वांना भेटून मेंबर होण्याचे आवाहन केले. सर्वांनी होकार दिल्यावर सोसायटी स्थापन करण्यासाठी चे सर्व सोपस्कार पूर्ण केले व डॉक्टर पुरंदरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अशा रीतीने 1978 मध्ये कोल्हापूर स्त्रीरोग संघटनेची मुहूर्तमेढ झाली. सोसायटी स्थापन झाल्यावर लगेचच डॉक्टर पुरंदरे यांच्या Live Surgery demonstration society च्या प्रोग्रॅम ची सुरुवात झाली यावेळी सीपीआर हॉस्पिटलमध्ये Vaginal Hysterectomy व Tuboplasty या surgical live demonstration डॉक्टर पुरंदरे यांनी दिले. त्यानंतर खरी सुरुवात मिटींग्स घेण्याची होती. त्यावेळी डॉक्टर कुडाळकर सर्वात सीनियर म्हणून त्यांना अध्यक्ष म्हणून पदाधिकारी दिला व मी सेक्रेटरी म्हणून काम पाहण्याचे ठरवले होते. डॉ. आशा थत्ते यांनी कोषाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. मिटींग्स बऱ्याच वेळा शनिवारी किंवा रविवारी असत. एक ते दोन महिन्यातून एकदा अशा होत असत त्यावेळी फक्त 100 रुपये होती. मिटींग्स चे सर्व फोन मीच करत असे. त्यावेळी मीटिंगसाठी आम्ही प्रत्येकाच्या घरी जमत असू. मीटिंग ही डिनर मीटिंग असे वेळ 9 ते11 रात्री असे प्रत्येक वेळा ज्याच्या घरी मिटींग असे त्याने एखाद्या केस वर discussion किंवा जर्नल मधील एका इंटरेस्टिंग टॉपिक वर चर्चा व डिस्कशन करणे असे स्वरूप असे माझ्याकडे AAL, AMRICAN FERRILITY, STERILITY याची जर्नल्स होती शिवाय दरवर्षी मी YEARBOOK घेत असे. बऱ्याचदा याच जर्नल्स मधील नवीन टॉपिक्स वर मीटिंगमध्ये चर्चा होत असे. तीन-चार वर्षे अशाच तऱ्हेने मीटिंग होत असत. मुख्य म्हणजे सर्व पैसे बँकेत तसेच राहत. खर्च कोणताच नाही. जेवण प्रत्येक जण घरी देई. मीटिंग उशिरा रात्री संपत ही लेडी डॉक्टरांची अडचण होती. यासाठी मी स्वतः माझ्या गाडीतून पाच सहा डॉक्टरांना घेऊन त्यांना पुन्हा घरी पोहोचवत असे. त्यामुळे उपस्थितीची काळजी नसे. माझ्या गाडीला त्यावेळी फीडर म्हणत. हा शब्द हल्लीच्या पिढीला नवीन. आम्ही लहान असताना सध्या लक्ष्मीपुरी येथे रिलायन्स मॉल च्या जागेत एसटी स्टॅन्ड होते त्यावेळी एक छोटी 10 ते 12 सीटर गाडी असे तिला फिडर म्हणत.चार वर्षानंतर जशी मेंबरची संख्या वाढू लागली तसे घरात मीटिंग घेणे अवघड झाले. मग मोठ्या हॉलमध्ये, डॉ. आरगडे यांचेकडे अगर हॉटेलमध्ये क्रमप्राप्त आले. आता तर या छोट्या रोपट्याचे बहारदार वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आता दळणवळणाची साधने, सोशल मीडिया ची भरारी, कम्प्युटर्स, मोबाईल फोन्स, इमेल यामुळे खूप सोपे झाले आहे आताच्या सोसायटीला माझ्याकडून भरभरून शुभेच्छा. 
डॉ. जनार्दन लक्ष्मण नागावकर

डाॅ. ज्याेत्स्ना भद्रे.